www.24taas.com, नवी दिल्ली
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना अण्णांच्या कालच्या वक्तव्यामुळे धक्का बसलाय. पण, अण्णा हे माझ्या पित्यासमान आहेत, ते माझे गुरु आहेत... ते माझ्या ह्रद्यात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
‘अण्णांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यामुळे मला खूप आश्चर्य वाटतंय. आम्ही दोघांनी एकत्र भ्रष्टाचारा विरुद्ध आंदोलन सुरू केलंय. पण, अण्णांच्या वक्तव्यामुळे मला खरंच खूप मोठा धक्का बसलाय’ अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीमध्ये व्यक्त केलीय. याचवेळी त्यांनी किरण बेदींवरही निशाणा साधलाय. बेदींना राजकारणात यायचं नसेल तर त्यांनी येऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि टीम अण्णाचे सूत्रधार असणाऱ्या अण्णांनी बुधवारी मीडियासमोर केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाचा आणि आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं होतं. केजरीवाल आणि आपले मार्ग वेगळे झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काल झालेल्या बैठकीनंतर अण्णांनी मीडियाशी बोलताना म्हटलं होतं की, ‘टीम अण्णा आता वेगळी झालीय, ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. मी कोणत्याही पार्टी किंवा समूहामध्ये सहभागी होणार नाही किंवा त्यांच्या प्रचारकार्यातही माझा सहभाग नसेल. तसंच मी त्यांना माझा फोटो आणि नाव वापरण्यासही बंदी केलीय. तुम्हाल लढायचं असेल तर स्वत:च लढा’…
अण्णांचं हेच शेवटचं वाक्य अरविंद केजरीवाल यांच्या जिव्हारी लागलंय. अण्णांचे विचार आमच्य़ा ह्रदयावर कोरलेत. त्यामुळं अण्णांच्या दृश्य फोटोची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलयं. अण्णांच्या विचारांशी कधीच फारकत घेणार नाही असंही केजरीवाल यांनी म्हटलय.काल अण्णांनी केजरीवाल यांच्या पक्षस्थापनेच्या निर्णयाशी फारकत घेतल्याचं जाहीर केल. त्यानंतर केजरीवालांनी ही प्रतिक्रिया दिलीये. सध्याच्या राजकीय पक्षांमधून बदल होणार नाहीत. व्यवस्था बदलायची असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जनतेला असाच पर्याय हवा असल्याचंही केजरीवाल यावेळी म्हणाले.