'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही

माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले.  'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.

Updated: Jul 26, 2015, 08:21 PM IST
'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही title=

नवी दिल्ली : माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले.  'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.

लष्कराचे जवान रात्रंदिवस देशाची सेवा करतात; मात्र तरीही त्यांना त्यांच्या हक्काचे न्याय्य वेतन मिळत नाही, असे मत हजारे यांनी यावेळी व्यक्त केले. 

'जवान सीमारेषेवर रात्रभर जागून पहारा देत असल्याने देशामधील नागरिक सुखाने झोपू शकतात. मात्र त्याच जवानास प्रतिष्ठेचे जीवन नाकारले जात आहे. तसेच युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नी आहेत. त्यांना महिन्याला अवघ्या चार हजार रुपयांचे वेतन मिळते. 

आता या वयात आणि अशा काळात त्यांना या तुटपुंज्या वेतनावर कुटूंबाचा खर्च चालविणे शक्‍य आहे काय? या सरकारने वन रॅंक वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

मात्र आता सत्ता आल्यानंतर कोणीही आपले काही वाकडे करु शकणार नाही, अशी सरकारची धारणा झाली असेल, तर आपला येणारा प्रत्येक दिवस अवघड होईल, याची जाणीव सरकारने ठेवावी, असे हजारे म्हणाले. 

‘वन रॅंक वन पेन्शन‘साठी हजारे २ ऑक्‍टोबरपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. 

माजी सैनिकांनी यापूर्वी ही योजना लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलिले आहे. या पार्श्वभूमीवर, माजी सैनिकांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.