www.24taas.com ,नवी दिल्ली
शुक्रवारी रात्री उशीरा अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना उपोषण सोडण्यासाठी गळ घातलीय. अरविंद केजरीवाल हे २३ मार्चपासून उपोषणाला बसले आहेत.
वीज बिलात झालेल्या दरवाढीविरोधात गेल्या आठ दिवसांपासून केजरीवाल उपोषणाला बसले आहेत. परंतू, त्यांची प्रकृती सतत ढासळत असल्यानं डॉक्टरांनी त्यांना उपोषण सोडण्याचा सल्ला दिला होता. केजरीवालांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेचा वृत्तांत अण्णांनी पत्रकारांसमोर मांडला. ‘मी केजरीवाल यांना सांगितल की, आपणच आपला जीव का द्यायचा? सरकारलाही तेच हवंय. हे उपोषण लोकांमघध्ये जागरूकता निर्माण करत आहे. भविष्यातही आपाल्याला असचं लढायचंय. त्यामुळे आता केजरीवालानी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आपण पुन्हा नव्या जोमाने लढू’ असं अण्णांनी यावेळी म्हटलंय.
अरविंद केजरीवाल यांनीही अण्णांचे आभार मानले. अण्णा रविवारी अमृतसरमध्ये जाऊन आपल्या राष्ट्रव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात गेल्या सप्टेंबरमध्ये फूट पडली होती. त्यानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसलेत... भ्रष्टाचारविरोधी अंदोलनाला राजकीय वळण दिल्यामुळे दोघांचे मतभेद झाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या वाटेनं जाण्याचा निर्णय घेतला होता.