www.24taas.com, नवी दिल्ली
राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाबाबत जाहीरपणे बोलण्याचं अनेक वेळा टाळलंय. पण, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी मात्र या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचंय पण जर देशातील जनतेनं कौल दिला तरच...’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
‘राहुल गांधी यांनी कधीही पंतप्रधानपदासाठी अनिच्छा व्यक्त केलेली नाही. त्यांनी फक्त जनसेवा आणि पक्षसंघटनेला प्राधान्य असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. राहुल गांधी हे पक्षातील जबाबदार नेते असून महत्त्वपूर्ण जबाबदारी घेण्यास ते सक्षमही आहेत... त्यांनी कधीही जबाबदाऱ्या टाळलेल्या नाहीत’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
एका वृत्तपत्रात दिग्विजय सिंह यांची याबाबतीत मुलाखत प्रकाशित झाली आहे. काँग्रेस राहुलच्या नेतृत्वातच २०१४ मधील सार्वत्रिक निवडणूक लढेल, असेही संकेतही त्यांनी दिलेत. देशभरातील काँग्रेस नेते व पक्ष कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठीचा पक्षाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राहुल यांच्या पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याच्या बातमीनं ते जबाबदारी टाळत असल्याचा नकारात्मक संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरला होता. या प्रकरणाचा निवडणूकीच्या तोंडावर पक्षास झटका बसू नये, असाच पक्षाचा प्रयत्न आहे.