बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!

सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या  एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 

Updated: Apr 17, 2015, 12:09 PM IST
बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी! title=

अहमदाबाद : सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या  एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 

गुजरातमध्ये एका २४ वर्षांच्या विवाहीत महिलेनं गर्भपात करण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागितली होती. २७ आठवड्यांचा हा गर्भ तिच्या पोटात वाढतोय. महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, १३ जुलै २०१४ रोजी अपहरण झाल्यानंतर सात महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यामुळे, ती गर्भवती राहिलीय. आपल्यावर हे मूल लादल जातंय.... आपल्याला या अपत्याला जन्म द्यायचा नाही, असा दावा करत या महिलेनं हायकोर्टाकडे गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. 

परंतु, या महिलेची याचिका रद्द करत न्यायमूर्ती जे बी परडिवाल यांनी, 'महिलेला हिंमत दाखवावी लागेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा महिलेनं बाळाला जन्म द्यावा. मला माहित आहे की न्यायाधिशासाठी हे केवळ वक्तव्य आहे कारण सगळी पीडा महिलेला सोसावी लागेल. हा कायदा कुणाला त्रास देणारा ठरत असेल तर हा 'कायदा' आहे आणि सगळ्यांना त्याचा सन्मान करावाच लागेल. तिला हे समजणं गरजेचं आहे की गर्भपात करताना तिचं आयुष्यही ती धोक्यात टाकतेय' असं म्हटंलय. 

'एका महिलेसाठी बलात्कारातून झालेल्या मुलाचं पालणं पोषण करणं खूपच कष्टदायक आणि अमानवीय आहे. या दरम्यान एखाद्या व्यक्तीला मानसिक, शारिरीक रुपात झगडावं लागतं. खास करून आपल्या देशातील लोक याकडे घृणास्पद नजरेनं पाहतात, हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे' असंही हायकोर्टानं म्हटलंय. 

यानंतर मात्र न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत महिला आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी तयार झालीय. 'माझा पती आणि माझं कुटुंब या मुलाला आपलंसं करण्यास तयार नाही. यासाठी मला गर्भपात करायचाय. पण, जर कोर्टाला वाटत असेल की गर्भपात होणं शक्य नाही तर आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करू' असंही तिनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.