श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अटक श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्रालमध्ये मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वात फुटीरवाद्यांनी बुधवारी श्रीनगरमध्ये काढलेल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकाविले. तसेच पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या होत्या. याबाबत सर्वत्र तीव्र पडसाद उमटलेत. तर दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये ठिकठिकाणी या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात येऊन फुटीरवाद्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या.
राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर सरकारला सांगितल्यानंतर, या प्रकाराबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद म्हणाले. त्यानंतर त्याला नरजकैदेत ठेवण्यात आले होते.
काश्मीर खोरे लष्कराच्या ताब्यात दिले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे, तर भाजपने जम्मू-काश्मीरबाबतचे धोरण स्पष्ट करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. फुटीरवाद्यांना, विशेषत: मसरत आलमला अटक करण्याची मागणी करून जम्मूमध्ये निदर्शकांनी या नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या, तसेच केंद्र व राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या.
जम्मू पश्चिम संघटनेच्या दीडशे जणांच्या गटाने पाकिस्तान, सईद व फुटीरवादी नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या. जम्मू शहराच्या सीमेवरील मुथी भागात काश्मिरी पंडितांच्या एका गटाने निदर्शने केली. हिंदू शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही हुर्रियतच्या नेत्यांचा निषेध केला, तसेच मसरत आलमविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. निदर्शकांनी जम्मूच्या अनेक भागांत वाहतूक रोखून धरली आणि गिलानी यांच्यासह हुर्रियत नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या.
सईद सरकारने फुटीरवादी नेत्यांविरुद्ध ताबडतोब कारवाई करावी किंवा परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिला होता. दरम्यान, फुटीरवादी नेत्यांनी काढलेल्या रॅलीत देण्यात आलेल्या पाकिस्तानसमर्थक घोषणा आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याच्या घटनेबाबत चहूबाजूंनी हल्ला चढवला गेल्यानंतर, हे प्रकार 'अमान्य' असून ते 'खपवून घेतले जाणार नाहीत', असे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांनी म्हटले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.