ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...

बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय. 

Updated: Nov 8, 2015, 08:03 PM IST
ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची... title=

पाटणा: बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय. 

ऐकलत... ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची.... बिहारमधल्या नितीश कुमारप्रणित महाआघाडीच्या विजयामुळं देशातल्या राजकारणात आलेली मोदी नावाची लाट खऱ्या अर्थानं ओसरल्याचं चित्र निर्माण झालंय. याच मोदी लाटेनं काँग्रेसला चारीमुंड्या चीत केलं होतं. देशातल्या सर्व भाजपविरोधकांमध्ये याच मोदी लाटेची धडकी भरली होती. केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपचा पहिला पराभव दिल्लीत झाला असला तरी आपनं इतरही प्रस्थापितांचा दारूण पराभव केल्यामुळं मोदी लाट ओसरेल की नाही याबाबत विरोधक कमालीचे साशंक होते. त्यामुळं भाजपविरोधी असलेल्या कथित धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी बिहारची निवडणूक खऱ्या अर्थानं लिटमस टेस्ट होती. 

आणखी वाचा - बिहार निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम

नितीश कुमार यांनीही मोदींशी दोन हात करण्यापूर्वी गेल्या वीस वर्षांपासून कट्टर विरोधक असलेल्या लालू प्रसाद यादवांना आणि काँग्रेसला कवटाळलं. ममता बॅनर्जींनी नितीश कुमारांच्या महाआघाडीला नैतिक पाठिंबा दिला. देवेगौडांपासून केजरीवालांपर्यंत सर्वांनीच नितीश कुमारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळं मोदी-शाहांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भाजपच्या घोडदौडीला रोखण्यासाठी नितीश कुमारांकडेच सर्व भाजपविरोधक तारणहार म्हणून पाहत होते. कारण पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना निवडणुकीला सामोरं जायचंय... तर काँग्रेसपुढंही पुढच्याच वर्षी आसाममध्ये सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. 

ज्या अमित शाहांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या खुबीनं यश मिळवलं होतं, त्या उत्तर प्रदेशात २०१७मध्ये मुलायम सिंह यांनाही निवडणुकीला सामोरं जायचंय... त्यामुळं नितीश कुमारांनी मिळवलेल्या या निर्विवाद यशामुळं या सर्वांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार. यापार्श्वभूमीवरच नितीश कुमार यांचा मोदींचा सर्वात मोठा विरोधक आणि यशस्वी चेहरा म्हणून समोर आलाय. त्यामुळं आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात मोदींना पंतप्रधानपदासाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते नितीश कुमार यांचं... म्हणूनच बिहारच्या निकालांपाठोपाठ राष्ट्रीय राजकारणानंही आपली कुस बदललीय हे नक्की....

आणखी वाचा - बिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.