www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आसाराम बापू आणि वाद हे जुनंच समिकरण आहे. कधी नेते-अधिकाऱ्यांना धमक्या दे, आपल्या भक्तांना लाथा-बुक्क्यांनी मार असली कृत्य आसाराम नेहमीच करत असतात. दुष्काळ असताना पाण्याची नासाडी करून वर त्याचं समर्थनही करतात.जिच्यावर बलात्कार झाला, तिचीच चूक आहे, असा संतापजनक दावाही त्यांनी केलाय.
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आसाराम बापू आणि वाद हे नातं तसं जुनंच आहे. असेच काही वाद ज्यामुळं आसाराम बापू अडचणीत आले...
> ऑगस्ट २००८ मध्ये आसाराम बापूंच्या छिंदवाडमधल्या गुरूकुलात दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी साक्ष देणारे माजी सचीव राजू चांडक यांना धमकावण्यापर्यंत बापूंची आणि त्यांच्या भक्तांची मजल गेली.
> ऑगस्ट २०१०मध्ये बापूंनी चक्क लाल दिव्याच्या गाडीतून प्रवचनस्थळी आगमन केलं आणि सर्वांनीच तोंडात बोटं घातली.
> २०११साली जुलैमध्ये बापूंनी सोनिया गांधींवर टिप्पणी केली. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सिंह यांना बापूंना समज द्यावी लागली.
> यंदा जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित मुलीचीच चूक असल्याचा अजब शोध बापूंनी लावला. त्यानंतर बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी होत असताना कायदा कठोर केल्यास त्याचा गैरवापर होईल, असं बापू म्हणाले.
> १६ जानेवारीला आसाराम बापूंनी ७०० कोटींची जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
> आश्रमात भक्तांचा गूढरित्या मृत्यू होण्याच्या घटनाही घडतच होत्या. ४ फेब्रुवारीला अशीच एक घटना घडली.
> त्यानंतर दोनच दिवसांनी आपल्याच भक्तांना लाथांनी मारहाण करत बापूंनी `प्रसाद` दिला.
> संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पाण्याची नासाडी केलीच. पण वर ती नासाडी नव्हे, प्रसाद होता असं सांगत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचंच काम बापूंनी केलं.
> आणि आता आसाराम बापूंविरोधात १६ वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झालाय...
पीडीत मुलीचे वडील आसाराम बापूंच्या लाखो भक्तांपैकी एक आहेत. मुलगी आजारी असल्यानं त्यांनी तिला उपचारासाठी आसारामबापूंच्या आश्रमात नेलं. मात्र तिथं आजार बरा करण्याऐवजी बापूंनी तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर याची वाच्यता करु नये यासाठी तिला धमकावलं. कुटुंबालाही मारण्याची धमकी दिली. पीडित मुलिनं सर्व प्रकार वडिलांना सांगितला आणि बापूंचं बिंग उघड झालं. मध्यप्रदेशातील छिंदवाडा आश्रमात या प्रकाराची घटना झाली. मात्र बापूंच्या दहशतीमुळं मुलीच्या कुटुंबियांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
आता या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर राजस्थान सरकारलाही जाग आलीये. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणाची सखोल तपास करण्याचं आश्वासन दिलंय. तर जोधपूरच्या पोलीस आयुक्तांनीही बापूंची चौकशी केली जाईल, असं सांगितलंय.
वारंवार वादात सापडणाऱ्या, आपल्या भक्तांचं लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या आसाराम बापूंची संत म्हणण्याची खरोखर योग्यता आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यांच्याभोवती असलेलं वलय आणि भक्तांचा गराडा याची फिकीर न करता या प्रकरणांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी जोर धरतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.