www.24taas.com, नवी दिल्ली
हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केलंय. खाप पंचायतीच्या मुलींचं १५ व्या वर्षातच लग्न लावून देण्याच्या फतव्यानंतर आता या महाशयांनी या आपल्या अकलेचे झरे पाझळलेत.
काँग्रेसचे हरियाणाचे प्रवक्ते धर्मवीर गोयत यांनी शुक्रवारी अतिशय वादग्रस्त आणि बेजबाबदार विधान केलंय. त्यांच्या मते, ‘जवळजवळ ९० टक्के मुली सहमतीनं शारीरिक संबंध बनवतात. जेव्हा मुली एखाद्या मुलासोबत जात असतात तेव्हा त्यांना आपण सामूहिक बलात्काराच्या बळी ठरणार याची भनकही नसते’. गोयल यांच्या या विधानावर वेगवेगळ्या स्थरांतून टीका सुरू झालीय. उल्लेखनीय बाब म्हणजे, हरियाणामध्ये आत्तापर्यंत एका महिन्याच्या कालावधीत बारा पेक्षा जास्त तक्रारींची नोंद झालीय. अशा स्थितीत काँग्रेस नेत्याच्या या विधानानं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.
काही दिवसांपूर्वीच, राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी ‘बलात्कार रोखण्यासाठी १५ वर्षांपर्यंतच्या मुलींची लग्न लावली पाहिजे. तेच योग्य आहे. यामुळे बलात्कारात वाढ होणार नाही. याचा गांभीर्याने विचार केला जावा’ असं म्हणत स्थानिक खाप पंचायतीच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचंच दाखवून दिलं होतं. ‘वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी मुलींनी १६ व्या वर्षात पदार्पण केल्याबरोबर त्यांचं लग्न लावून द्यायला हवं’अशी सूचना खाप पंचायतीनं केली होती.