गुवाहाटी : काँग्रेससमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 43 आमदार हे दुसऱ्या पक्षात गेले आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश आहे. या सगळ्या आमदारांनी पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश म्हणजेच पीपीए या पक्षात प्रवेश केला आहे.
दोनच महिन्यांपूर्वी खांडू हे अरुणाचलचे मुख्यमंत्री झाले होते. आता मुख्यमंत्रीच 43 आमदारांना घेऊन पीपीएमध्ये गेल्यामुळे आता अरुणाचलचं सरकार हे जवळपास पीपीएचं झालं आहे.
नाबाम तुकी हे आता अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये असलेले एकमेव आमदार आहेत. नाबाम तुकी हे अरुणाचलचे मुख्यमंत्री होते. पण जानेवरी 2016 मध्ये काँग्रेसचं सरकार पडलं. यानंतर अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
राष्ट्रपती राजवटीनंतर कालिको पूल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली, पण सुप्रिम कोर्टानं फटकारल्यानं खांडू हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.