आजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`

अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 6, 2012, 10:55 AM IST

www.24taas.com, अयोध्या
अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत-नेपाळच्या सीमेवर सुरक्षा तैनात करण्यात आलीय. एकिकडे विश्व हिंदू परिषद या दिवसाला शौर्य दिनाच्या रुपात साजरी करते त्याचवेळेस मुस्लिम संघटना मात्र व्यापारी बंद पाळून या दिवसाचा निषेध व्यक्त करतात.

विहिंपच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आज होणाऱ्या संत संम्मेलनात वादग्रस्त धर्मस्थळावर भव्य राम मंदिराच्या निर्माणाचा संकल्पनेचा मुद्दा तसंच काशी आणि मथुरेच्या मुक्तीचाही मुद्दा उठवला जाणार आहे. विहिप आणि बजरंग दलाननं घरासमोर पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्याचं आवाहन लोकांना केलंय. दुसरीकडे बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीच्या म्हणण्यानुसार आज मुस्लिम संघटना मात्र दुकानं बंद ठेऊन या दिवसाचा निषेध व्यक्त करणार आहेत. बाबरी मस्जिदच्या पुनर्निर्मानासाठी दुआ यावेळी मागितली जाईल. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नजमूल हसन गनी यांनी ६ डिसेंबर हा दिवस मुस्लिम समुदाय काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचं म्हटलंय.
सुरक्षेच्यादृष्टीनं अयोध्या-फैजाबादला सहा झोन आणि १२ सेक्टरमध्ये विभागलं गेलंय. दोन्ही ठिकाणचे रेल्वे स्टेशन, बस डेपो अशा सार्वजनिक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेत. त्यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज मागवण्यात आलीय. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कलम-१४४ लागू राहणार आहे.