गुवाहाटी : आसाम आणि अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकांणी गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालाय. पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलन झालेय. यात १० जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
अरुणाचल प्रदेशात अनेक भागांना पुराचा तडाखा आसाममधील बराक खोऱ्यात करीमगंज, हैलाकांडी भागात जोरदार पावसानंतर भूस्खलनाने झाले. करीमगंज जिल्हय़ात सोनाशिरा येथे दरड कोसळण्याच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण दगावलेत. जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन टेकडीच्या खालच्या भागात असलेले घर गाडले गेले. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यातील मृतांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी, मुलगी व दोन मुलग्यांचा समावेश आहे.
हैलाकांडी जिल्हय़ात भूस्खलनाच्या दोन घटनांत बिलाईपूर येथे चार जण ठार झाले, तर रामचंडी भागात सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. दोन घरांवर चिखलाचा ढिगारा कोसळून या लोकांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस यांनी मदतकार्य सुरू केलेय. इटानगर- अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे नोआ-देहिंग नदीला पूर आलाय. नामसई जिल्ह्य़ातील महादेवपूर-१ आणि महादेवपूर-४ आणि काकोनी गावांत पुराचे पाणी शिरले असून पिकांचे मोठे नुकसान झालेय.