गंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 05:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.
येत्या महिन्याभरात गंगा स्वच्छतेचा आराखडा सादर करण्याचं जलसंपदा आणि गंगा स्वच्छता मंत्री उमा भारती आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. नवा कायदा हा याचीच पहिली पायरी असल्याचं मानलं जातंय.
गंगेच्या साफसफाई मोहिमेबद्दल केंद्र सरकार खूपच गंभीर असल्याचं दिसतंय. यानुसार, गंगेमध्ये थुंकणाऱ्यांना किंवा नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार अशा लोकांवर 10 हजार रुपयांचा दंड आणि तीन दिवसांची शिक्षा ठोठावण्यावर विचार करतंय.
वाराणसी मतदार संघातून निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर गंगेच्या साफ-सफाईचा मुद्दा आहे. मोदींनीही निवडणूक प्रचारादरम्यान गंगा स्वच्छतेचं आश्वासनही जनतेला दिलं होतं. याचसाठी एक वेगळं मंत्रालयही बनवण्यात आलंय आणि त्याची जबाबदारी उमा भारती यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.