सोन्यानं गाठला उच्चस्तर; चांदीचीही उसळी

लग्नसराईच्या दिवसांत सोन्यानं पुन्हा एकदा उसळी घेतलीय. सोमवारी एकदमच १०० रुपयांची उसळी घेत सोन्यानं आत्तापर्यंतचा उच्चस्तर गाठलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2012, 09:29 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
लग्नसराईच्या दिवसांत सोन्यानं पुन्हा एकदा उसळी घेतलीय. सोमवारी एकदमच १०० रुपयांची उसळी घेत सोन्यानं आत्तापर्यंतचा उच्चस्तर गाठलाय.
१० ग्राम सोन्यासाठी आता तब्बल ३२,९५० रुपये मोजावे लागणार आहेत. या अगोदर १४ सप्टेंबर रोजी सोन्यानं ३२,९०० रुपयांचा स्तर गाठला होता. औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्यानं चांदीच्या भावानंही उचल खाल्लीय. तब्बल २०० रुपयांनी उसळी घेत चांदी ६३,२०० रुपये किलोवर पोहचलीय.
बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या लग्नसराईचे दिवस असल्यानं सोन्या-चांदीला मागणी वाढलीय. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरण्याचा परिणामही सोन्याच्या किंमतीत वाढ झालीय. डॉलरच्या तुलनेत रुपयांची सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.
घाऊक बाजारात सोनं ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेच्या भावावर तब्बल शंभर रुपयांची उसळी घेऊन अनुक्रमे ३२,९५० आणि ३२,७५० रुपयांचा नवा दर प्रस्तापित केलाय.