भारत बनला 'झिका'वर लस शोधणारा पहिला देश

मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका वायरस संबंधी एका भारतीय औषध निर्मिता कंपनीनं लस शोधल्याचा दावा केलाय. 

Updated: Feb 4, 2016, 05:46 PM IST
भारत बनला 'झिका'वर लस शोधणारा पहिला देश title=

नवी दिल्ली : मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका वायरस संबंधी एका भारतीय औषध निर्मिता कंपनीनं लस शोधल्याचा दावा केलाय. 

हैदराबाद स्थित 'भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड'नं केलेल्या दाव्यानुसार, ही लस झिका वायरसशी लढण्यासाठी सक्षम आहे. 

भारतीय संशोधकांचा दावा 

'मेक इन इंडिया' या मोहिमेंतर्गत हा शोध लावण्यात यश मिळाल्याचा दावा हैदराबादच्या संशोधकांनी केलाय. 

जागतिक आरोग्य विभागाने झिका आणि त्यातून उद्भवणारे दोष ही जागतिक आपत्ती असल्याचे घोषित केले आहे. लॅटिन अमेरिकेतील २० पेक्षा जास्त देशांमध्ये या रोगाचा प्रार्दुभाव झपाटय़ाने होतोय. अमेरिकेतील टेक्सास शहरात दुर्मीळ स्वरूपाच्या झिका रोगाचा प्रार्दुभाव हा शारीरिक संबंधातून देखील होत असल्याचे अहवालात नमूद केलं गेलंय. त्यामुळेच सगळं जग या वायरसमुळे हादरलंय. 

'झिका' या रोगावरील प्रतिबंधात्मक औषधाचा पेटंट असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय.  'झिका' या रोगाला प्रतिबंध करणाऱ्या औषधांची निर्मिती करणारी जगातील एकमेव कंपनी असून नऊ महिन्यांपूर्वीच या औषधाचा पेटंटसाठी प्रयत्न सुरू केल्याचे भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इला यांनी म्हटलंय. 

भारतीय कंपनीनं केलेला हा दावा निश्चितच समाधानकारक असल्याचं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. डॉ. इला यांच्या मतानुसार, सध्याच्या परिस्थितीत चार महिन्याच्या कालावधीत साधारण एक अब्ज औषधाची निर्मिती करण्याची क्षमता कंपनीची आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे प्रयत्न सुरू असून नियामक मंडळाच्या आवश्यक परवानग्या जलदगतीने मिळल्यानंतरच या औषधांचा फायदा ब्राझील आणि बीआरआयसीएसचे सदस्य असणाऱ्या (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांनाही होणार आहे.