मुंबई : स्विमिंग पूलमध्ये चष्म्याशिवाय पोहायला गेल्यानंतर तुम्हालाही डोळे लाल झाल्याचा अनुभव आलाय का? पण, असं का होतं?
लोकांना वाटतं की स्विमिंग पूलच्या पाण्यात असलेल्या क्लोरीनमुळे डोळे लाल होतात. परंतू ही गोष्ट चुकीची आहे. खरं म्हणजे, पाण्यातल्या 'क्लोरॅमाइन'मुळे (chloramines) तुमचे डोळे लाल होतात.
जेव्हा एखादी व्यक्ती स्विमिंग पूलच्या पाण्यातच मूत्रविसर्जन करतो तेव्हा क्लोरीनसोबत केमिकल रिअॅक्शन होऊन 'क्लोरॅमाईन' तयार होतं. म्हणजेच, क्लोरीन नाही तर क्लोरीनमध्ये मिसळलेलं मूत्र तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरतं.
क्लोरामाईन डोळ्यांसाठी तर हानिकारक आहेच परंतु, यामुळे शरीराला खाजही येऊ शकते. अनेक लोक स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरल्यानंतर पाण्यातच मूत्रविसर्जन करतात, त्यामुळे हे पाणी इतरांसाठी हानिकारक ठरू शकतं.
पाण्यात कुणी मूत्रविसर्जन करू नये, याची खबरदारी घेण्यासाठी पाण्यात 'युरीन इंडिकेटर डाय' नावाचं एक केमिकल स्विमिंग पूलच्या पाण्यात टाकलं जातं. त्यामुळे, जेव्हा एखादी व्यक्ती क्लोरीनयुक्त पाण्यात मूत्रविसर्जन करते तेव्हा आजुबाजूचं पाणी निळ्या रंगात बदलतं.