www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपण सगळ्यांचा विचार करतो... अगदी सगळ्यांचा... पण स्वत:चा करतो कधी? विचार करा. आपण नसलो या जगात तर कुणाचं काही अडेल. मग आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.
इतरांनी आपल्याला आपलंसं करावं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण स्वत:ला आहोत तसं स्वीकारायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग, माझं नाक एवढूसकच आहे, माझा रंग बरा नाही, केस चांगले नाही, दात वाकडे आहेत, डोळेच सुंदर नाही असे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. कसं बरं साध्य होणार हे... पाहा...
> आपण सांगून टाकू स्वतला मी छान आहे. मस्त आहे. सुंदर आहे. लोकांना मी सुंदर वाटो ना वाटो, मी आहे तशी जगात एकमेव आहे आणि मी जी/ जो आहे तो अत्यंत सुंदर माणूस आहे.
> आपण घेऊ या स्वत:ची काळजी. पण म्हणजे चेहऱ्याला फेसपॅक लावणं नव्हे. स्वतची काळजी घेणं म्हणजे स्वत:कडे लक्ष देणं, वेळ देणं... शारीरिक आणि मानसिकही.
> आपण जेऊ वेळच्या वेळी... एवढं तरी करूच स्वत:साठी.
> रोज ठरल्यावेळी करू शांतपणे नाश्ता... बकाबका उभ्या उभ्या खाणं बंद करू... घरी शिजवलेलं अन्न खाऊ.
> आपण जे खातो, त्याचप्रमाणे आपला स्वभाव बनतो, वृत्ती बनते. तुम्ही काय खाता हे सांगा, मी तुमचा भविष्य आणि स्वभाव सांगतो असं म्हणतात. आपण काय खातो. कडबा? कशासाठी? आपण जरा प्रेमानं खिलवू ना स्वतलाही!
> शिजवू जरा घरीच काहीतरी... स्वत:साठी, जिवाभावांच्या माणसांसाठी... त्यातून जो आनंद मिळेल तो आपल्याला खूप रिलॅक्स करू शकतो, ते अनुभवून पाहू.
> आपण होऊ जरा शांत... सारखी काय स्पर्धा आणि इतरांना मागे टाकून पुढे जायची घाई... आपण आपल्या स्पीडने जाऊ... कधी रमतगमत, कधी सुपरफास्ट... इतरांचा पाठलाग केल्यासारखं काय म्हणून जगायचं.
> आपण करू या का थोडा वेळ खर्च स्वत:साठी... आपण काय वागतो. कसे बोलतो. का चिडतो. कुणाला दुखवतो हे जरा पाहू. नाहीतर आपलं लक्ष सतत इतरांवर आणि स्वत:ला मात्र आपण आतून पोकळ होत जातोय याकडे लक्षच नाही.
> आपण करू ना आपल्या माणसांवर प्रेम... अगदी मनापासून... कशाचीही अपेक्षा न ठेवता... सारखे काय व्यवहार गिफ्टचे आणि रिटर्न गिफ्टचे... त्यापेक्षा जे द्यायचं ते मनापासून देऊन टाकू.
> मुख्य म्हणजे आपण जसे आहोत तसे राहू... चेहऱ्यावर मुखवटे नको, मेकअपची पुटं नको आणि खोटं उसनं हसू नको... आपण भरभरून हसू... वाटलं तर मनमोकळं बोलू आणि रडूही... पण सारं मनापासून. यंदा मनापासून जगण्याची सुरुवात करू. पुन्हा कधीच जगायला मिळणार नाही या भावनेनं जगू!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.