मुंबई: राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय.
उकाड्यात शरीराच्या तापमानात वाढ होते. मेंदूला जास्त तापमान सहन होत नसल्यानं मायग्रेन आणि डोकेदुखीच्या घटना वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत तापमान सर्वाधिक असतं. या काळात मायग्रेनचा त्रास असणाऱ्या रुग्णांचा त्रास बळावतो. उन्हाळ्यात मायग्रेनचा त्रास वाढल्यानं मळमळणं, उलट्या होणं असाही त्रास होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
काय घ्याल काळजी -
डोकेदुखी टाळण्यासाठी योग्य वेळी आहार घेणं, उन्हात न फिरणं, तेलकट, तिखट पदार्थ खाणं टाळणं, हे साधे नियम पाळावेत. मात्र डोकेदुखी सुरू झाल्यावर पेन किलर, पॅरासिटमोलच्या गोळ्या घेणं योग्य नाही. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. पण, यावर उपाय म्हणजे उन्हात जाताना डोकं झाकावं, तणाव घेऊ नये, पाणी प्यावं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.