थंडीच्या दिवसात काय खावं?

थंडीचा मोसम सुरू झाला की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी पडते. थंडीचा बचाव करण्यासाठी गरम आणि उब देणारे कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र, या मोसमात खायचे काय याचा कोणी विचार केला आहे का?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 25, 2012, 08:25 PM IST

www.24taas.com,मुंबई
थंडीचा मोसम सुरू झाला की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी पडते. थंडीचा बचाव करण्यासाठी गरम आणि उब देणारे कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र, या मोसमात खायचे काय याचा कोणी विचार केला आहे का?
थंडीच्या दिवसात थोडं जास्त खाणे ठिक असते. जास्त खाल्लं तरी काही त्रास होत नाही. थंडीच्या हंगामात तूप जास्त खा आणि बाजरीचा वापर करा. त्यामुळे सांध्यांमधील लुब्रिकेशनला मदत होते. आहारातील तूप, दही, बाजरी या घटकांचं प्रमाण वाढवा. त्यामुळे आपल्या आरोग्याला आराम पडतो आणि थंडीच्या दिवसात काहीही त्रास होत नाही.
त्या त्या हंगामानुसार मिळणारी फळं खावीत. तुम्हाला जी आवडतात ती फळं खा. सकाळी उठल्यावर पहिला आहार हा फलाहार असेल तर उत्तम. किंवा पोहे, उपमा असे पदार्थ खावेत आणि त्यानंतर चहा किंवा कॉफी घ्यावी. सकाळी रिकाम्यापोटी पहिला चहा किंवा कॉफी नको.

फास्ट फूड टाळा
गृहिणी घरी नसली की फास्ट फूड मागवा किंवा तिला एखाद्या दिवशी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला अथवा ती दमलेली असली तर फास्ट फूड मागवा, जेवणाच्या चवीत बदल हवा आहे ना, मग फास्ट फूड मागवा, या सवयीमुळे घरचं जेवण अळणी झालं आहे. फास्ट फूड टाळणे गरजेचे आहे.
शरिराला नको ती सवय लावू नका. फास्ट फूड आरोग्याला चांगले नाही. त्यामुळे शक्यतो टाळणेच आवश्यक आहे. फास्ट फूडसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. हे जेवण शरिराला पचले नाही की मग डॉक्टरांकडे जा. तेथे पुन्हा पैसे मोजा. महागाईत असे पैसे आणि वेळ वाया गेला तर तुमचे आरोग्य कसे ठिक राहणार?
फास्ट फूड मागवा आणि खा हा विचार चुकीचा आहे. त्यापेक्षा स्वत: जेवण करून अधिकच रुचकर होईल, यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे कुटुंबातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर घरचं जेवण जेवल्याचा आनंद आणि समाधान दिसेल. ते समाधान फास्ट फूड खाऊन मिळणारं नाही.