पंकज झरेकर, पुणे
http://www.pankajz.com
तथाकथित जगाहून वेगळी, पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात म्हणजे ट्रेकर्स. तो कसा असतो? ट्रेक म्हणजे कर्मधर्मसंयोगाने घडलेली किंवा मित्र घेऊन जातात म्हणजे करावयाची चैन नाही, तर तो असतो एक धर्म... श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा... रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच. तर हा प्राणी ओळखायचा कसा? सोप्पं आहे हो. खाली दिलेली काही जंत्री जुळली की त्याला खात्रीने ट्रेकर म्हणा.
- केस अगदी बारीक कापलेले आणि दाढी, कल्ले किंवा मिशा काही तरी हौसेने कोरलेली. पण सोमवारी केलेली दाढी आठवड्यात करण्याचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे फक्त सोमवारी तुळतुळीत दाढी आणि इतर दिवशी खुंट.
- हाताच्या नखांच्या आजूबाजूचे सालं हमखास निघालेली असतात.
- मान, कानांच्या पाळ्या उन्हाने करपलेल्या असतात.
- चेहरा आणि पावडर-फेसक्रीम यांचा संबंध कधीतरी स्वतःच्याच लग्नाबिग्नात आलेला.
- डॉक्टरने कधीतरी गुडघा दुखतो म्हणून ट्रेक कमी करायला सांगितलेले असतात. पण तो सल्ला या पठ्ठ्याने हमखास धुडकावलेला असणार.
- फॉर्मल कपडे आणि शूज म्हणजे एखाद्या जगात सगळ्यात असह्य गोष्ट मानणारा. त्याऐवजी कार्गो ट्राऊझर आणि टीशर्ट ओवणारा (कपडे परिधान करणे नाही, ओवणेच).
- कळकटलेली जीन्स ही घरात बळेच घेतली तरच धुवायची असते असे मानणारा.
- खरेदी करताना या कपड्याची किंवा शूजची ट्रेकसाठी किती उपयुक्तता आहे या एकाच निकषावर खरेदी करणारा.
- ब्लॅक, ग्रे, ब्राऊन, बिज, ऑलिव्ह ग्रीन यापलीकडे रंग असतात हे गावीही नसते
- ट्रेकसाठी वेगळा बुटांचा जोड असलेला. लेदर ऐवजी कॅनव्हासच्या बुटांना पसंती देणारा.
- वुडलॅंडने कितीही आऊटडोअर म्हणून जाहिरात केली तरी बुटांची निरुपयुक्तता कायम जाणून असणारा. त्याऐवजी ऍक्शन ट्रेकर या स्वस्त बुटांना आपले म्हणणार.
- नियमित ट्रेकर कधीच ट्रेकला हाफ बाह्यांचे टीशर्ट/पॅंट किंवा जीन्स घालणार नाही. त्याऐवजी पूर्ण अंग झाकेल असाच टीशर्ट आणि ढगळ ट्राऊझर घालणार. त्यातही वर दिलेले तीनचार रंगच असणार.
- चष्मा असला तरी फायबरच्या फ्रेमचा घेणार.
- प्रवासात कमीत कमी गरजा असलेला. तीन दिवसांच्या मुक्कामासाठीही फक्त एकच लहान सॅक घेणार.
- बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे मानणार (किंबहुना माझ्यासारखा ते पाणी अगदी गरम जरी प्यायले तरी सर्दी होणारा).
- मिळेल ते जेवण आणि मिळेल तशी जागा `किती सही आहे` असे म्हणणार.
- कुणीही सोबत असले आणि कितीही वेळा किल्ला पाहिला तरी पुन्हा पुन्हा भटकणार.
- अंताक्षरी-छाप ट्रिप्स आणि पिकनिक्समध्ये काडीमात्र इंटरेस्ट नसणार.
- सिरियल्स पहायची की सर्व्हायवल स्टोरी यावरुन घरी रिमोटची खेचाखेची होणार.
- टीम गेट टुगेदरसाठीही रिव्हर राफ्टिंग किंवा रॉक क्लाइंबिंग अशा ऍक्टिव्हिटीज सुचवणार.
- टाय-डेला हमखास याच्याकडे घालयला चांगला टाय नसणार, पण पन्नास फुटी रोप नक्की असणार.
- सगळे रस्ते माहित असणार. गोव्यापासून कुत्र्याच्या चाव्यापर्यंत सगळी माहिती असणार. कालवणापासून मालवणापर्यंत आख्खी दुनिया पालथी घालणार. पण ऑफिसात कुणी वीकेंडला फॅमिली घेऊन जायला जवळची जागा विचारली तर विचारात पडणार.
- शहरात बाईकने फिरताना वाहतुकीचे नियम पाळणार, हेल्मेट नियमित वापरणार.
- याच्या कीचेनला बायकोने दिलेल्या बाहुली किंवा बदामात कोरलेल्या नावाच्या आद्याक्षराऐवजी कॅरिबिनर आणि होकायंत्र असणार.
- पाकिटात गणपतीच्या फोटोसोबतच एखादे बॅन्डएड नक्की असणार.
- चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणार आणि घरी जाऊन डस्टबिनमधेच टाकणार, त्याच्या गाडीचे पीयुसी अपटूडेट असणार.
- वॉशरुममधले उघडे नळ स्वतः बंद करणार.
- मोबाईल घेताना जीपीएसवाला घेणार. ट्रेकचा एक वेगळा मोबाईल आणि बीएसएनएलचे सिमकार्ड असणार. मोबाईलमध्ये लुनार कॅलेंडर आणि डिजिटल कंपास हमखास इन्स्टॉल केलेले असणार.
- आठवडाभर इंटरनेटवर नवनवीन ठिकाणं आणि त्याची माहिती शोधणार.
- याच्या ब्राऊझर बुकमार्क्समध्ये डेकॅथलॉन, प्लेग्राऊंडॉनलाईन अशा साईट्स असणार. हा सतत त्यावर हेडटॉर्च, कॅरिबिनर, स्लीपिंग बॅग, टेंट यांच्या किंमती पाहणार.
- निम्मे इमेल्स फक्त आणि फक्त ट्रेक्सबद्दलचे असणार.
- दिवसातून किमान तीन मित्रांशी ट्रेकबद्दल चॅट कर