www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसने एक्झिट पोल फेटाळून लावले आहेत, यापूर्वीही देशाच्या जनतेने एक्झिट पोल पाहिले आहेत. प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर एक्झिट पोलमध्ये मोठी तफावत दिसून आल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
यामुळे 16 मे रोजीचं दिसेल हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुमताचे सरकार दिल्लीत सत्तेवर येईल, असे विविध वृत्तवाहिन्यांच्या "एक्झिट पोल`द्वारे व्यक्त केलेल्या अंदाजावर काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, संयुक्त जनता दलासह इतर पक्षांच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
जेथे 80 कोटी जनता मतदान करतात त्या देशात काही वृत्तवाहिन्यांचा अंदाज कसा खरा मानायचा, असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीत असमाधानकारक कामगिरीला राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नसल्याचे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान संपल्यानंतर काही वेळातच विविध वृत्तवाहिन्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताने सत्तेवर येणार असून, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचा धुव्वा उडणार असल्याच्या वृत्तावर सर्वप्रथम काँग्रेसने सडकून टीका केली.
काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले. ते म्हणाले, कोणी काही अंदाज व्यक्त करू द्या. 16 मे रोजी प्रत्यक्षात मतमोजणीला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा चित्र स्पष्ट होईल.
पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद यांनीही सिंह यांच्या सुरात सूर मिसळला असून ते म्हणाले, 2004 आणि 2009 मधील निवडणुकीत काय झाले होते याचा अनुभव आहे. काँग्रेस 16 मे या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. "एक्झिट पोल`च्या चर्चेत म्हणूनच काँग्रेसचे नेते सहभागी झाले नाहीत, असंही अहमद यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.