www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचं सरकार लवकरच आपापल्या जागा घेणार आहे... पण, यामुळे भारत-पाकिस्तानमधले क्रिकेट संबंध कायमचे संपुष्टात येणार का? हा प्रश्न निर्माण झालाय तो उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्यामुळे...
एनडीएचा एक भाग असणारे आणि महाराष्ट्रात 18 जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या पक्षाचे - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल दिल्लीमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी, ‘पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध संपुष्टात यायला हवेत’ अशा आशयाचं वक्तव्य केलं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानसोबतचे संबंध संपुष्टात आणण्याची भाषा केली होती.
बाळासाहेबांचा हाच मुद्दा अधोरेखित करत ‘पाकिस्तान भारतात घुसखोरी करतं... आपल्या सैन्यांना मारलं जातं... अशावेळी आपण त्यांच्यासोबत खेळ खेळत बसणार, हे कसं योग्य असू शकतं? हेच आमचं आणि तुमचंदेखील मत असेल’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या मते, पाकिस्तानसोबत जेवढ्यात तेवढे संबंध असायला हवेत... चांगल्या कामांना चांगलं उत्तर आणि वाईट कामांना वाईट उत्तर देऊन पाकला प्रत्यूत्तर द्यायला हवं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
गेल्याच आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं, पुढच्या वर्षी भारतासोबत टेस्ट सीरिज खेळण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. पीसीबीनं आपण यासंदर्भात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासोबत (बीसीसीआय) या आशयाची बोलणी केल्याचंही म्हटलं होतं. पीसीबीचे सीईओ सुभान अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये 2015 ते 2023 दरम्यान सहा सीरीज खेळल्या जातील. यापैंकी चार मॅच पाकिस्तानात होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.