www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या `चोरी चोरी चुपके चुपके` भेटीगाठी घेतल्यानं शिवसेना-भाजप युतीचा संसार मोडण्याची चिन्हं होती. मात्र भाजपच्या नेतृत्वानं धावाधाव करून तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुखांची समजूत काढलेली दिसतेय.
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय. तसंच राजकारणातून जे संपले आहेत, त्यांना आता मोदींचा मुखवटा घालून वावरावं लागतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेलाही टोले लगावलेत.
भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची आज चांगलीच धावाधाव झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर यानिमित्तानं उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला हाणण्याची एकही संधी सोडली नाही. गुप्त बैठक घेऊन काय झाले ते जाहीर करू असं फडणवीसांच्या बैठकीनंतर उद्धव यांनी राज-गडकरी यांना टोला हाणला. दरम्यान भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत.
घडामोडींचा पाहा घटनाक्रम
सकाळी 8 वाजता
भाजप आणि मनसे नेत्यांच्या गुप्त समझोत्यांमुळं शिवसेनेत सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली, तेव्हा भाजपच्या काळजाचा ठोकाच चुकला. भाजप आणि मनसे नेत्यांच्या `गुप्त` भेटीगाठींमुळे नाराज शिवसेना युती तोडणार की काय, अशी शक्यता वर्तवली जात होती. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काडीमोड नको, म्हणून भाजपच्या नेत्यांची पळापळ सुरू झाली.
सकाळी 9.45 वाजता
भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांची समजूत काढली. संध्याकाळी आपण स्वतः भेटीसाठी येत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
दुपारी 12.15 वाजता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही धावतपळत मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना हा भाजपचा विश्वासू सहकारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मात्र उद्धव ठाकरे अजूनही घुश्शातच होते. फडणवीसांच्या भेटीनंतरही त्यांनी भाजपवर टोलेबाजी सुरूच ठेवली. आम्ही गुप्त बैठक घेऊन काय झाले, ते जाहीर करू, असा उपरोधिक चिमटा त्यांनी काढला.
दुपारी 12.40 वाजता
फडणवीस भेटीनंतर उद्धव ठाकरे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कार्यक्रमासाठी दादरला पोहोचले. त्यांच्या नाकावरचा राग अजून शांत झालेला नव्हता. मात्र तरीही पंतप्रधानपदासाठी मोदींनाच पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दुपारी दीडच्या सुमारास शिवसेना भवनात वरिष्ठ शिवसेना नेते आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरू झाली. लोकसभेची रणनिती आखण्यासाठी ही बैठक असली तरी तिचा मुख्य अजेंडा होता तो भाजप आणि मनसे नेत्यांची वाढती सलगी... युतीबाबत उद्धव ठाकरे बैठकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
दुपारी 3 वाजता
बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन युती अभेद्य राहणार असल्याचा खुलासा केला. मात्र भाजपला आणि मनसे नेत्यांना चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना भाजपमधले काहीजण बिब्बा घालत आहेत, अशी टीका त्यांनी गडकरींचे नाव न घेता केली. तसंच राजकारणातून जे संपले आहेत, त्यांना आता मोदींचा मुखवटा घालून वावरावं लागतंय, असा टोलाही मनसेला लगावला.
त्यामुळं युतीमध्ये तूर्तास तरी घटस्फोट होणार नाहीय. मात्र मनसेच्या रूपानं दोघात तिसरा आल्यानं संशयकल्लोळ सुरू झालाय... युतीत सगळं काही आलबेल नाही, सेना-भाजपच्या संसाराला तडे गेलेत, एवढं मात्र यानिमित्तानं स्पष्ट झालंय...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.