शिवसेनेच्या `जल्लोषा`त उद्धव ठाकरेंना मोदींचा विसर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयोत्सवाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळला. या लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या यशाचं सारं श्रेय त्यांनी शिवसैनिकांना दिलं. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अवजड उद्योग खात्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात आहे की काय असं बोललं जातंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 2, 2014, 08:07 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजयोत्सवाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामोल्लेख टाळला. या लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या यशाचं सारं श्रेय त्यांनी शिवसैनिकांना दिलं. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अवजड उद्योग खात्याची सल उद्धव ठाकरेंच्या मनात आहे की काय असं बोललं जातंय.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं.. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा शिवसेनेला झाला. या निवडणुकीत शिवसेनेची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी दिसून आली आणि त्यांचे १८ खासदार संसदेत पोहचले..याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनेनं जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित अठरा खासदारांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेना खासदारांप्रमाणे मुंबईतले भाजपचे नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. यावेळी एकीकडे शिवसेना खासदारांचा सत्कार उद्धव यांनी केला. तर दुसरीकडे भाजप खासदारांना या कार्यक्रमात सापत्न वागणूक मिळाल्याचं दिसून आलं. या भाजप खासदार आणि त्यांच्या अध्यक्षांचा सत्कार शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख आणि आमदार अनिल परब यांनी केला. यावेळी खुद्द उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते या तिघांचा सत्कार करण्याचं भान राखण्यात आलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव यांनी आपल्या भाषणात मोदींचा उल्लेख केला नाही. त्यांनी विजयाचं श्रेय शिवसैनिकांना दिलं.
हा संपूर्ण प्रकार पाहता शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अवजड उद्योग खात्याची सल उद्धव यांच्या मनात कायम असल्याचं या निमित्ताने दिसून आलं.. शिवसेनेचे १८ खासदार निवडून आलेले असताना एकमेव कॅबिनेट मंत्रीपद आणि ते ही कमी महत्तवाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे..
त्यातच लोकसभा निवडणुकतीत महाराष्ट्रात महायुतीचे ४२ खासदार निवडून आलेत. त्यांत शिवसेनेचे १८ तर भाजपचे २३ खासदार आहे. त्यामुळं भाजपनं विधानसभा निवडणुकीत जागा वाढवून घेण्यासाठी दबावाचं राजकारण सुरु केलंय. तसंच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा पदाचा दावा करण्यात येतोय. त्यामुळं शिवसेनेत अस्वस्थता आणि चिंता आहे.

शिवसेनेच्या विजयोत्सवात याच दबावाच्या राजकारणाचा उद्धव ठाकरेंनी वचपा काढला तर नाही ना. शिवसेनेची भाजपला डिवचण्याची खेळी तर सुरु झाली नाही ना असे सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेत.
विशेष म्हणजे मनसेच्या शनिवारच्या सभेत राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींचं अभिनंदन केलं होतं. मात्र एनडीए आणि महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींचं नाव घेणे टाळल्यानं नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.