शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही- उद्धव

शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 31, 2014, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झालाय. शिवसेनेची ताकद कमी होणं शक्यच नाही. यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाची गुढी उभारणार असा विश्वासही त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय.
शरद पवारांबाबत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, "ते जे परवा ‘लाइटली’ बोलले आहेत की बोटावरची शाई पुसा आणि दुसर्‍यांदा शिक्का ठोका. मलासुद्धा हेच म्हणायचं होतं की सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न जो आज तुम्हालाही पडलेला आहे. एवढा राग, एवढी चीड असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी पुन: पुन्हा निवडून कशी येते? तर त्या विजयामागे हा सगळा बोगसपणा आहे."
पुढं उद्धव ठाकरे म्हणतात, "जर बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान करणं हे जर ते लाइटली बोलत असतील तर तुम्हीच विचार करा हे लोक गांभीर्याने काय काय करीत असतील? कारण नाही तर हे शक्यच नाही. म्हणजे शेतकर्‍यांचे तळतळाट घरामध्ये येऊन त्यांना पुन्हा मतपेटीत मते कशी येऊ शकतात. या प्रश्‍नाचं उत्तर आतापर्यंत जे कुणालाच सापडत नव्हतं ते आज पवारांनी दिलं आहे".
उद्धव ठाकरे यांनी इशरत जहाँ प्रकरणी सरकारची वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहितांच्या बाबतीत भेदभाव का? असा सवाल विचारलाय. उद्धव ठाकरे म्हणाले, "इशरतला तुम्ही निरपराध म्हणता. त्यासाठी सरकार स्वत: धावाधाव करते. त्या हेडलीने शिकागोच्या कोर्टात सांगितलं की लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी होती. मानवी बॉम्ब होती, परंतु तिला शरद पवारांनी, जितेंद्र आव्हाडांनी निष्पाप ठरवलं आहे. तिला निरपराध ठरवलं मग तुमच्या कोठडीत सडणार्‍या इतर निरपराध हिंदूंचे काय?" साध्वी प्रज्ञासिंग सहा वर्षांपासून त्यांच्या कोठडीत सडतेय. कर्नल पुरोहितांसारखा शूर राष्ट्रभक्त योद्धाही सडतोय. त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाहीय. त्यांच्यावरती आरोपपत्र का ठेवलं जात नाही? का केस चालवली जात नाही?

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.