www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूचं दु:ख बाजूला ठेऊन शशि थरुर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यावेळी, दाखल केलेल्या शपथपत्रात केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी आपली संपत्ती जवळजवळ २३ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय.
तिरुअनंतपुरममधून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या थरुर यांनी शपथपत्रात २०१२-१३ मध्ये त्यांचं उत्पन्न ७५ लाख ४० हजार ६५० रुपये असल्याचं सांगितलंय.
शशि थरुर यांनी आपल्याकडे सोन्याचे दागिने तसंच आणखी काही किंमती वस्तूंशिवाय कंपनी शेअर्स, बॉन्ड, बँक खातं आणि म्युच्युअल फंडमध्ये एकूण ९.४० करोड रुपयांची गुंतवणूक असल्याचं शपथपत्रात म्हटलंय.
तिरुअननंतपुरममध्ये त्यांच्या नावावर एक अपार्टमेंटदेखील आहे जे त्यांनी ४५ लाखांमध्ये खरेदी केलं होतं. आता या अपार्टमेंटची किंमत आहे ६५ लाख रुपये. त्यांच्या एकूण स्थावर मालमत्तेची किंमत आहे ९४ लाख ४० हजार ९६६ रुपये....
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शशि थरुर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या संसदीय क्षेत्रात केलेल्या कामांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. लोक पुन्हा एकदा आपल्यालाच निवडून संसदेवर पाठवतील, असं त्यांचं ठाम मत आहे. थरुर यांच्या दाव्यानुसार, केरळमध्ये सत्तेविरोधी लाट नाही. परंतु, ही निवडणूक खूप सोपी असेल असंही त्यांना दिसत नाहीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.