www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, हे सांगणं अवघड झालंय. कारण कधी मोदींची गुपचूप भेट घेणारे, त्यांची स्तुती करणारे पवार आता त्यांच्यावर हल्ले चढवतायत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं खळबळ उडाली होती. त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्यानंतर, कृषिमंत्री या नात्याने आपण एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो, त्यात वावगे काय, असा खुलासा करण्याची पाळी पवारांवर आली होती. त्यातच गुजरात दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोदींना दोषमुक्त ठरवल्यानंतर, याच पवारांनी त्यांची पाठराखण केली होती. आता मात्र त्याच दंगलीवरून ते मोदींवर हल्ले चढवत आहेत.
नरेंद्र मोदींच्या हाती देशाची सूत्रे गेली तर देशाचे नुकसान होईल, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. परवा नवी मुंबईतील भाषणातही शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले. एवढंच नव्हे तर गुजरातच्या नरेंद्र मोदींना महात्मा गांधींचा इतिहास कसा माहित नाही, यावरून त्यांनी खिल्लीही उडवली.
त्यामुळं शरद पवारांच्या मनात नरेंद्र मोदींबद्दल नेमक्या काय भावना आहेत, तेच कळत नाही. आता शरद पवार आपल्या खास शैलीत हा संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण करतायत की काय, अशीही शंका घेतली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.