मनसे आमदार राम कदमांवर अॅट्रॉसिटी

घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Apr 22, 2014, 03:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पार्कसाइट पोलिसांनी अॅट्रॉसिटी, अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.
या प्रकरणी आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थी आणल्याचा दावा आमदार राम कदम यांनी केला होता. तसेच विक्रोळी, घाटकोपरमध्ये बॅनरबाजी करून 18 ते 20 एप्रिलदरम्यान या अस्थींच्या दर्शनासाठी त्यांनी आपल्या घरी दलित बांधवांना आमंत्रण दिले होते.
या अस्थींबाबत जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या तीन तरुण कार्यकर्त्यांना काल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या वेळी जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकीही दिली.
तसेच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशीही धमकी दिली. कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत दोन कार्यकर्ते गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रिपब्लिकन जनतेने घाटकोपर, एलबीएस मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. पार्कसाइट पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.