राज ठाकरेंचं छगन भुजबळांना आव्हान

राज ठाकरेंकडून रमेश किणी आणि तेलगी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेस आलं आहे. तुम्ही रमेश किणी प्रकरण उकरून काढाल, तर मी तेलगीपासून सगळी प्रकरणे उकरून काढेन, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना जाहीर सभेत दिलं.

Updated: Apr 20, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
राज ठाकरेंकडून रमेश किणी आणि तेलगी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेस आलं आहे. तुम्ही रमेश किणी प्रकरण उकरून काढाल, तर मी तेलगीपासून सगळी प्रकरणे उकरून काढेन, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ यांना जाहीर सभेत दिलं.
छगन भुजबळ यांनीही यापूर्वी रमेश किणी प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा राज ठाकरेंना दिला होता, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून नाशिकमध्ये निवडणूक लढवत आहेत.
छगन भुजबळ यांच्यावर मी टीका केली, तर उद्या लगेचच ते पत्रकार परिषद घेऊन किणी प्रकरण काढण्याची धमकी देतील. मात्र त्यांनी किणी प्रकरण काढावे, मी त्यांचे घोटाळे बाहेर काढतो, असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं आहे.
मोदींना पाठिंबा माझी मर्जी
नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, कारण माझी मर्जी आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी मोदींचे सलाईन वापरण्यास सुरुवात केली, अशी टीकाही राज यांनी मनसे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारसभेत केली.
सर्वात आधी मी सांगितलं होतं
लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांचा मुखवटा मनसे वापरत असल्याची टीका शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये केली होती. त्याला उत्तर देताना राज म्हणाले, २0११ मध्ये मी मोदींना पाठिंबा दिला. मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान झाली पाहिजेत, हे मी सांगितले होते. तेव्हा मोदी हे शिवसेनेच्या गावीही नव्हते.
भुजबळांना घरी जेवायला बोलवतात
शरद पवार यांनी मंत्रिपदाचे लालूच दाखविल्यानंतर ज्या छगन भुजबळ यांनी सेना फोडली, इतकेच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची टी बाळू अशा शब्दात निर्भर्त्सना केली, कोर्टात खटला दाखल केला, गृहमंत्री झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याची तयारी केली, त्या भुजबळांना उद्धव ठाकरे सन्मानाने घरी जेवायला बोलावतात, असे राज यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली तरी त्यांना जेवणासाठी उद्धव घरी बोलावतात, मी स्वत:हून पक्ष सोडला असताना माझ्यावर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करतात; हा काय प्रकार आहे, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
छगन भुजबळ यांची २00९ मध्ये २१ कोटींची मालमत्ता होती. आज ती २ हजार २४५ कोटी रुपये कशी झाली, असा आरोप करतानाच भुजबळ यांच्या विदेशातील कंपन्या, भुजबळ पब्लिक ट्रस्टला विविध कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्या याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी सादर केला.
भुजबळ यांची सिंगापूरमध्ये चौकशी सुरू आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे सांगताना भुजबळ यांनी महाराष्ट्र लुटला आता दिल्ली लुटायला जाणार का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
..तर नाशिक महापालिकेची निवडणूक लढवणार नाही
नाशिक महापालिकेच्या कारभाराबाबत नेहमीच विचारणा होते, असे सांगून राज ठाकरे यांनी, पाच वर्षे पूर्ण झाल्यावर आम्हाला विचारा, जर काहीच केले नसेल तर पुन्हा महापालिका निवडणूक लढविणार नाही, असं जाहीर सभेत सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.