www.24taas.com, झी मीडिया, पुणे
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.
कदम आणि पायगुडे यांनी परस्परांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळं पुण्याचं राजकीय वातावरण तापलं असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मतदारसंघातील बंदोबस्त वाढवल्याचं समजतं.
विश्वजीत कदम आणि त्यांच्या आठ साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय. या सर्व नऊ जणांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप करुन भारती विद्यापीठाच्या आयुर्वेदिक कॉलेजच्या उपप्राचार्यांसह दोन व्याख्यात्यांना बेदम मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. रास्ता पेठेतील पूना कॅफेमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास पैसे वाटप सुरू होते, असा आरोप मनसेनं केला. भारती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडून जप्त केलेली १६ लाखांची रोकड, मतदार याद्या, स्लीप, कोणाला किती पैसे द्यायच्या याच्या नोंदी, काही मोबाइल नंबर लिहिलेला कागद आणि प्रचार पत्रकंही मनसेनं पोलिसांच्या ताब्यात दिली होती. या घटनेनंतर पायगुडे यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून डॉ. विश्वजीत कदम यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली, तर डॉ. विश्वजीत कदम यांनी पायगुडेंवर बनाव रचल्याचा आरोप केला.
पुण्याच्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये कदम आणि पायगुडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उद्या पुण्यात लोकसभेचं मतदान आहे. पुण्यातून मनसेचे दीपक पायगुडे, काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम, भाजपचे अनिल शिरोळे आणि आपचे सुभाष वारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.