नागपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसे भाजपला मतदान करणार आहे. नागपूर महापालिकेत मनसेचे दोन नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्तानं भाजप मनसे मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे.
शिवसेनेला उपमहापौरपद देण्यास नकार देणाऱ्या भाजपनं आता मनसेची मदत घेतली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतही भाजप मनसेची मदत घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नागपुरात भाजपप्रणित विकास आघाडीत आता मनसेही सहभागी झाली आहे. भाजपाध्यक्ष नितीन गडकरींच्या नागपुरातच भाजप मनसे मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे हे विशेष म्हणावं लागेल.
त्यामुळे नागपूरमध्ये युती न करताही भाजप आपला महापौर बसविणार आहे. त्यामुळे मनसे भाजपच्या अगदीच जवळ आली आहे. सत्तेसाठी कोणत्याही भलत्यासलत्या बिळात जाऊ नका हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकसाठी सांगितले होते. मात्र आता नागपूरमध्ये तरी भाजप सत्तेसाठी मनसेचीच साथसोबत घेणार आहे. निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.