'मनसे'ची 'मना'पासून यादी जाहीर..

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोणाचा पत्ता कट झाला आहे, आणि कोणाला संधी मिळणार हेदेखील स्पष्ट होईल.

Updated: Jan 29, 2012, 06:16 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोणाचा पत्ता कट झाला आहे, आणि कोणाला संधी मिळणार हेदेखील स्पष्ट होईल. मनसेच्या विद्यमान सात नगरसेवकांना संधी मिळणार का ? याकडेही अनेकांचं लक्ष आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यादी जाहीर करण्यापूर्वी राज यांनी स्पष्ट केलं की 'ही यादी बनविण्यासाठी नक्कीच वेळ लागला'. 'कारण की सगळी निवडप्रकिया थोडीफार किचकट होती', 'पण याचा अर्थ मी कुणासाठीही थांबलो नव्हतो'. 'किंवा मला बंडखोरीची चिंता देखील नाही'.

 

मनसेच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली.  मुंबईत २२७ जागांपैकी २०८ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ठाण्यात ११५, पुण्यात १३८ तर नाशिकमधल्या ११२ उमेदवारांची नावे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली. उमेदवारांच्या नावापुढे परिक्षेतील गुणही देण्यात आलेत. उमेदवारी न मिळालेल्यांची माफी मागतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

यावेळी शिवसेनेवर त्यांनी टीका केली. मनातून हरलेलेच तोडफोडीचं कृत्य करतात असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई बरोबरच पुणे, नाशिक ठाणे या चार प्रमुख महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. आता मनसेने आपली यादी जाहीर केल्याने आता इतर पक्ष नक्की काय भुमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.