www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोपी नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी देणारा अध्यादेश फाडला तेव्हा पंतप्रधानांच्या मुलीलाही वाटत होतं की आपल्या वडिलांनी राजीनामा द्यावा... असा दावा केलाय पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारू यांनी..
आपल्या वादग्रस्त ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्ताकाच्या मुंबईत झालेल्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान बारू बुधवारी बोलत होते. 2009 साली यूपीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपण पंतप्रधानांना अनेकदा राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर दोषी खासदारांना निवडणूक लढण्याची परवानगी देणारा अध्यादेश काढला होता. मात्र राजकीयदृष्ट्या गंभीर चूक केल्याची जाणीव होताच हा अध्यादेश फाडून टाकण्याच्या लायकीचा आहे; अशा स्वरुपाचे वक्तव्य करुन राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा अपमान केला होता. बारु यांच्या म्हणण्यानुसार अध्यादेश फाडल्यानंतर ‘सरते शेवटी मीच टीव्हीवर येऊन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असं जाहीरपणे सांगितलं होतं. मला पंतप्रधानांच्या मुलीकडून एक मॅसेज मिळाला होता. यामध्ये तीदेखील माझ्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं होतं’. पण, बारू यांनी पंतप्रधानांच्या दोन मुलींपैकी कोणत्या मुलीनं आपल्या वडिलांच्या राजीनाम्यावर आपली सहमती दर्शवली होती हे मात्र सांगितलं नाही.
यूपीएच्या 2009 सालच्या विजयावर पृथ्वीराज चव्हाण यांना काय वाटतं होतं?
2009 साली झालेला यूपीएला मिळालेला विजय आपलाच विजय असल्याचं पंतप्रधानांना वाटत होतं. ‘त्यापूर्वी मी त्यांना कधीही पायावर पाय चढवून बसलेलं पाहिलं नव्हतं. परंतु, त्या दिवशी (2 जून 2009) जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते आपले पाय एकमेकांवर चढवून बसले होते आणि मिळालेल्या विजयासंबंधीच बोलत होते. परंतु, कुणीही त्यांना विजयाचं श्रेय दिलं नाही. माझे मित्र पृथ्वीराज चव्हाण, ज्यांना पंतप्रधानांनीच पीएमओमध्ये आणलं होतं त्यांनीदेखील या विजयाचं श्रेय राहुल गांधींनाच दिलं होतं’ असं बारू यांनी यावेळी म्हटलं.
पहिली पाच वर्ष सफलतेची आणि पुढच्या पाच वर्षांत डळमळलेला हा एक राजनैतिक प्रयोग होता, अंसही बारू यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.