www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढतीनं चुरस निर्माण केलीय. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे गजानन किर्तीकर कंबर कसतायत. तर मतदारसंघ कायम राखण्यासाठी काँग्रेसच्या गुरुदास कामतांचीही चांगलीच दमछाक होतेय.
उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबई मतदारसंघात यंदा बॉलीवूड कलाकरांच्या उमेदवारीमुळं चांगलाच रंग चढलाय. काँग्रेसकडून विद्यमान खासदार गुरूदास कामत, शिवसेनेकडून गजानन किर्तीकर, मनसेकडून अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, आपकडून मयांक गांधी, सपाकडून गायक कमाल खान आणि राष्ट्रीय आम पार्टीकडून एटम गर्ल राखी सावंत इथून रिंगणात आहेत.
या लोकसभा मतदारसंघातर्गंत सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम अशा चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. तर गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व इथं शिवसेनेचे आमदार आहेत. सुमारे 17 लाखांच्या आसपास मतदार असलेल्या या मतदारसंघात मराठी मतदार 35 टक्यांहून अधिक आहेत. तर उत्तर भारतीय मतदार सुमारे 20 टक्क्यांच्या आसपास, मुस्लिम मतदारही 20 टक्क्यांच्या आसपास आहेत. तर गुजराती मतदार 10 आणि द. भारतीय मतदार 5 टक्के आहेत.
उत्तर भारतीय आणि मुस्लिम व्होट बँक नेहमीच काँग्रेसच्या पाठिशी राहत आलीय. तर मोदी फॅक्टरमुळं यावेळी गुजराती मते शिवसेनेला मिळतीलही. परंतु मागील वेळेप्रमाणे शिवसेना-मनसेत मराठी मतांची होणारी विभागणी अपरिहार्य आहे. गोरेगाव, जोगेश्वरीमध्ये शिवसेनेला अनुकूल परिस्थिती आहे. तर वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि पश्चिममध्ये काँग्रेस मजबूत असल्यानं सेनेची दमछाक होणाराय. महापालिका निवडणुकीत वायव्य लोकसभा मतदारसंघातील 36 पैकी 24 जागांवर शिवसेना-भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांच्या आणि मोदी फॅक्टरवर शिवसेनेची भिस्त आहे. तसंच काँग्रेसचे गुरुदास कामत यांचा कमी जनसंपर्कही शिवसेनेच्या पथ्यावर पडू शकतो.
पाचवेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या गुरुदास कामतांना सहाव्यांदा संसदेत जाण्यासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागणारेत. आप आणि सपाचे उमेदवार काँग्रेसच्या व्होट बँकेवर डल्ला मारू शकतात. परंतू सध्या त्यांच्या प्रचार रॅलीना लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून येतं. अनेक निवडणुकांचा अनुभव पाठिशी असल्यानं कुठली रसद कुठं पोहच करायची. हे त्यांना चांगलं अवगत आहे.
अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे महेश मांजरेकरही मतदारसंघातील गल्लीबोळात जावून मतदारांशी संपर्क साधतायत. त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दीही करत आहेत. परंतु ही गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होणार का. हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं सध्या तरी त्यांची सारी भिस्त राज ठाकरे फॅक्टरवरच आहे.
आपचे मयांक गांधी काही मते खेचू शकतीलही, परंतु वरील तीन मुख्य उमेदवारांच्या तुलनेत ते फार मागे राहतील असं दिसंत. मयांक गांधींपेक्षा वाईट स्थिती असणाराय ती नौंटकीबाज राखी सावंत आणि सपाच्या कमाल खानची. त्यामुळं खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच असणाराय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.