www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.
आज सकाळी अहमदाबादमधील एका मतदान केंद्रावर नरेंद्र मोदी मतदान करण्यासाठी पोहोचले आणि गांधीनगर मतदारसंघासाठी त्यांनी मतदान केलं. या मतदारसंघातून भाजपचे लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवत आहेत. मोदींनी "अडवाणीजींसाठी मतदान करणं माझ्यासाठी सौभाग्याचं आहे" , असं ट्वीटही केलं.
मतदान केल्यानंतर मोदींनी पत्रकारांसोबत बातचित करत सर्वांनी मतदान करण्याचं मतदारांना आवाहन केलं. हे मतदान म्हणजे नवीन सरकारचं शिलान्यास आहे. नरेंद्र मोदी पुढे हे ही म्हणाले की, यंदा निवडणुकीत २५ वर्षांपूर्वीचा बहुमताचा रेकॉर्ड तोडणार. मजबूत सरकार देण्यासाठी लोकही मोठ्या संख्येनं मतदान करत आहेत.
मोदींनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. तसंच प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं गुजरातच्या जनतेला वेळ देऊ शकलो नाही, असा खेदही मोदींनी व्यक्त केला. त्यांनी गुजरातच्या जनतेची क्षमाही मागितली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.