www.24taas.com, झी मीडिया, रायगड
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
सुनील शाम तटकरे यांची अधिकृत ओळख अपक्ष उमेदवार अशी होणार असली तरी, त्यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळं मंत्रिमहोदयांना हक्काची मतं गमवावी लागण्याची शक्यता आहे. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे पवारांच्या एनसीपीचं म्हणजे जलसंपदामंत्र्यांचं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ आणि नव्यानं उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनील शाम तटकरे यांनी चक्क मनगटावरचं घड्याळ आपलं निवडणूक चिन्ह मिळवलंय.
सुनील शाम तटकरे हे मूळचे रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याचे रहिवासी असून, सध्या ते नालासोपाऱ्यात वडापावची गाडी चालवतात. रायगड मतदारसंघात एनसीपीच्या सुनील तटकरेंसमोर आधीच शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते, शेकापच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे मूळचे एनसीपीचे नेते रमेश कदम आणि आपचे संजय अपरांती यांचं तगडं आव्हान आहे.
त्यामुळं आता त्यात भर घालत तटकरेच तटकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.