मोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे

गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो

Updated: May 1, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो, पण हाच गुजराती समाज महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच पुढे आला नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजाला फैलावर घेतले. आधी दक्षिण भारतीय आणि नंतर उत्तर भारतीयांवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आता थेट गुजराती समाजावर टीका केली आहे.
गुजराती व्यापारी समाजाने शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एकत्र यावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी `सामना`मधील संपादकीयमधून गुजराती समाजाला केले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लिहिलेल्या अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणतात, `महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी आपला जीव दिला. यानंतरच महाराष्ट्र राज्याची निर्मीती करण्यात आली. पण या गोष्टीच मराठी व्यतिरीक्त इतर सामाजाला काहीच घेण देण नसतं.`
`महाराष्ट्रात राहून गुजराती समाजाने बक्कळ पैसा कमवला, पैशाचे इमले उभे केले. पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा समाज नेहमी आपली उपस्थिती नसल्यासारखेच दर्शवतो.` अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मोदींसाठी एकत्र येणाऱ्या गुजराती समाजाने आता महाराष्ट्र घडवण्यासाठीही एकत्र यावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.