www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत... पण, त्यांची धास्ती मात्र अंडरवर्ल्ड जगतात आत्तापासूनच पसरलीय. एका रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनणार या भीतीनं पाकिस्तानात बसलेल्या आणि 1993 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार दाऊद इब्राहिमही धास्तावलाय आणि त्यामुळेच त्यानं आपलं ठिकाण बदललंय. अफगाणस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर त्यानं सध्या आसरा घेतलाय... सध्या तो इथंच राहत असल्याचं समजतंय.
प्रचारादरम्यान एका मुलाखतीदरम्यान मोदींनी सत्तेवर आल्यास पाकिस्तानातून दाऊदला परत आणणार, असा दावा एका गुजराती टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितलं होतं. या रिपोर्टनुसार, गुप्तचर संस्थेच्या एक तृतियांश भागाला असा विश्वासच नाही तर खात्री आहे की, मोदींनी धडाकेदार विजयासोबत केंद्रातील सत्ता काबिज केलीय आणि त्यामुळेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्न करतील.
दाऊद इब्राहिम याला आपल्याविरुद्ध कमांडो ऑपरेशनचीही भीती सतावतेय. पाकिस्तानात ओसामा बिन लादेनचा खात्मा अमेरिकेनं याच पद्धतीनं केला होता. या ऑपरेशनमध्ये अमेरिकेनं गुप्त पद्धतीनं पाकिस्तानातील एबटाबादमध्ये राहणाऱ्या अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याल ठार केलं होतं... आणि या ऑपरेशनचा पत्ताही कुणाला लागला नव्हता. मोदींच्या बाबतीत अशाच पद्धतीची भीती मुंबईतील काही अंडरवर्ल्ड जगताशी संबंध असणाऱ्या अपराध्यांना वाटतेय, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.