www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
केंद्रानं चौकशीसाठी निवडलेली वेळ पूर्णपणे चूकीची असल्याची उघड नाराजीही या दोन्ही पक्षांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर हा प्रकार निषेधार्ह असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे चौकशी समिती नेमणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोदींची पाठराखण, प्रफुल्ल पटेलांनी मोदींना क्लिन चीट दिलीय.
याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सनंही हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीचा विरोध केला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही चौकशीची वेळ चूकीची असल्याचं सांगत केंद्राच्या निर्णयावर टीका केलीय. याबाबत काल रात्रीच माझं वडीलांशी बोलणं झालं. त्यांनाही ही बाब खटकलेली आहे. डिसेंबरमध्ये जर या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय झाला होता तर मग तेव्हाच चौकशी आयोग नेमायला हवा होता. आता पाच महिन्यानंतर त्याची चौकशी करणं अयोग्य आहे, असे ओमर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, काँग्रेस महिला हेरगिरीप्रकरणाच्या चौकशीवर ठाम असल्याचं दिसत असून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही राज्याच्या सरकारी यंत्रणांचा हेरगिरीसाठी वापर करणं गैर असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. एकूणच काय तर हेरगिरी प्रकरणी मोदींची कोंडी करु पाहणाऱ्या काँग्रेसची मात्र गोची झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.