मोदी... विकास नाही विनाश पुरुष - उमा भारती

सध्या, भाजपच्या तिकिटावरून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमा भारती चांगल्याच गोत्यात आल्यात... त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे काही नेते उमा भारती यांचीच एक व्हिडिओ क्लीप जाहीर केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 18, 2014, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सध्या, भाजपच्या तिकिटावरून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमा भारती चांगल्याच गोत्यात आल्यात... त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे काही नेते उमा भारती यांचीच एक व्हिडिओ क्लीप जाहीर केलीय. ज्यामध्ये उमा भारती आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला म्हणजेच मोदींना `विनाश पुरुष` संबोधत आहेत.
काही दिवसांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आपल्या वेबसाईटवर काँग्रेसनं वापरला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या खांद्यावर शस्त्र ठेवून नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याचं काम यातून काँग्रेसनं केलं होतं. तोच प्रकार आता पुन्हा एकदा समोर आलाय.

यावेळी, काँग्रेसनं टार्गेट केलंय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि भाजपच्या झांशीच्या उमेदवार उमा भारती... आज भाजपच्या उमेदवार म्हणून स्वत:चा प्रचार करणाऱ्या याच उमा भारती यांनी काही काळापूर्वी भाजपशी काडीमोड घेत `भारतीय जनशक्ती पक्ष` काढत आपली वेगळी चूल मांडली होती. उमा भारती यांनी त्या वेळी मोदींविरुद्ध विष ओकलं होतं... त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ काँग्रेस आता आपल्या प्रचारादरम्यान वापरत आहे.
`नरेंद्र मोदी हे विकास पुरुष नसून विनाशपुरुष आहेत` असं वक्तव्य करताना उमा भारती या व्हिडिओत दिसतात. मोदी हे हुकुमशाह असल्याचंही त्या यावेळी म्हणताना दिसतात. काँग्रेसनं गुरुवारी हा व्हिडिओ जाहीर केलंय.

अलिकडेच उमा यांनी अटलबिहारी वाजपेयी हे मोदींपेक्षा खूप चांगले वक्ते होते, असं वक्तव्य करून उमा भारती अडचणीत आल्या होत्या. आता या व्हिडिओवर त्यांची काय प्रतिक्रिया असेल याची प्रतिक्षा भाजपचे नेत्यांनाही आहे.
पाहा, काय म्हणतायत उमा भारती

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.