www.24taas.com, झी मीडिया, पुणे
निवडून दिल्यानंतर मी समाजासाठी काय केले हे सांगता आले पाहिजे, असं म्हणत मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार “मला मदत केल्याशिवाय काँग्रेसच्या काहींना पर्याय नाही”, ही माहिती पायगुडेंनी दिली.
सुरेश कलमाडी आणि रमेश बागवे यांच्याकडून मदत होतच आहे. याशिवाय रोहित टिळक हेही मदत करतील, असा दावा दीपक पायगुडे यांनी केलाय. शिवाय शिवसेनेची मला या वेळीही मदत होणार असंही ते म्हणाले.
पुण्याची ही जागा निवडून येणार असल्यानेच राज ठाकरे यांनी इथं लक्ष घातलं आहे. भ्रष्टाचाराबाबत मी लक्ष केंद्रित केलं आहे. मी कुणाला पैसे दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत, हे सांगत मला सामाजिक कार्य करायचंय असं पायगुडेंनी स्पष्ट केलं.
विश्वजित कदम हे पुण्याचे मतदार नाहीत, मग ते पुण्याचे खासदार होणार तरी कसे? अनिल शिरोळे व मी १९९२मध्ये एकत्रच नगरसेवक होतो. आमच्या तिघांचा विचार केल्यास मला ही निवडणूक अवघड नाही. सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये आमचे नेटवर्क चांगले आहे.
पुण्यात लोकांचा घरांचा प्रश्न मोठा आहे. मला त्यांना घरं देण्यात रस आहे. या प्रश्नावर मी लढणार आहे. पुण्यात वाहतुकीच्या प्रश्नातही लक्ष घालणार आहे. निवडणूक हा माझा उद्योग नाही. आता मी लक्ष घातलं असल्यानं यापुढं महापालिकेतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची कामगिरी दिसून येईल. प्रसंगी खळ्ळ-खटॅकची भाषाही वापरली जाईल, असा इशाराही दीपक पायगुडे यांनी दिला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.