www.24taas.com, वृत्तसंस्था, इंफाळ
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे. इंफाळ येथील इनर मणिपूर मतदारसंघात असाच प्रकार समोर आला आहे. इनर मणिपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार थोकचोम मेईन्या यांचे वय ५ वर्षांत चक्क ११ वर्षांनी वाढले आहे.
थोकचोम मेईन्या यांनी निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले वय ६९ वर्षे असल्याचे म्हटले आहे; विशेष म्हणजे २००९ निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय ५८ वर्ष होत. लोकसभेच्या संकेतस्थळावर त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९४५ सालचा दिसतो, असं असेल तर मग, गेल्या पाच वर्षात मेईन्यांचे वय ११ वर्षांनी कसं वाढलं?
या प्रश्नाबाबत थोकचोम मेईन्यांना विचारले असता, मेईन्या म्हणतात "२००९मध्ये त्यांच्या जन्मतारखेच्या नोंदणीत काहीतरी गडबड झाल्याचे सांगून, आपली जन्म तारीख ही लोकसभेच्या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणेच असल्याचे स्पष्ट केले आहे".
अजब गोष्ट म्हणजे वयाप्रमाणेच त्यांच्या मालमत्तेतही वाढ झाल्याचं त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसत आहे. पाच वर्षात मेईन्यांची मालमत्ता ७.७ लाखवरुन आता ती १४.१ लाख एवढी झाली आहे. तसेच जंगम मालमत्ताही ३.७ लाखांवरून थेट १५.३ लाखांवर पोचली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.