www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी चांगलेच क्रोधीत झालेले दिसले. इतकंच नाही तर, त्यांनी समोरच्या पत्रकाराला आपलं व्हिडिओ फुटेज नष्ट करण्य़ासाठी त्यांनी धमकावलंही...
भाजप नेते मुरली मनोहर जोशी सध्या कानपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. याचवेळी काही पत्रकारांनी जोशींना मोदींबद्दल काही प्रश्न विचारले. यामुळे, जोशी महोदय अत्यंत गंभीर झाले... आणि त्यांनी आपल्याला केवळ कानपूरबद्दलच प्रश्न विचारण्याचा हुकूम पत्रकारांना सोडला.
इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर मोदींबद्दल पत्रकारांनी केलेल्या प्रश्नानंतर जोशींचं प्रत्यूत्तर कॅमेऱ्यात कैद झालं होतं... हे फुटेज डिलीट करण्यास त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी, उपस्थित पत्रकारांनी हे फुटेज करण्यास नकार दिला. तेव्हा, `हे व्हिडिओ फुटेज नष्ट करा नाहीतर तुम्ही घरी जाऊ शकणार नाही` असं म्हणत त्यांनी पत्रकारांना धमकीदेखील दिली.
मुरली मनोहर जोशी हे सध्या वाराणसीतून पक्षाचे खासदार आहेत आणि यावेळीही त्यांना याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, भाजपनं त्यांची जागा नरेंद्र मोदींना देऊन टाकली आणि मुरली मनोहर जोशी यांना कानपूरला लावलं... पक्षाचा हा निर्णय काही जोशींना पचलेला दिसत नाहीए...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.