www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात इसमानं हल्ला चढवला. राजधानी दिल्लीच्या दक्षिण पुरी भागात निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान ही घटना घडली. या व्यक्तीनं केजरीवाल यांना `फाईट` मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीनं त्यांना पाठीवर बुक्का हाणला. यावर `आप`च्या उपस्थित कार्यकार्यकर्त्यांनी या व्यक्तीला मारहाणही केली.
आप आदमी पार्टीचा रोड शो दक्षिण दिल्लीतल्या दक्षिणपुरी भागातून सुरू होता. यावेळी एका इसम केजरीवाल यांच्या खुल्या जीपवर अचानक चढला... आणि त्यानं केजरीवाल यांच्यावर थपडींचा आणि बुक्क्यांचा मारा केला.
या दरम्यान आप कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. रोड शो दरम्यान केजरीवाल यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखविणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार ते दिल्लीचे रहिवासी आहेत आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावरून ते केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ले झाले आहेत. तसंच वाराणसीमध्ये त्यांच्यावर शाईही फेकली गेली होती. हरियाणातही एका व्यक्तीनं रोड शो दरम्यान केजरीवाल यांना थप्पड लगावली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.