www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.
अमित देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेस होईल, अशी वारंवार चर्चा होती. मात्र अखेर लोकसभा निवडणुकीतील फटक्यानंतर काँग्रेसनं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची तीन मंत्रीपदे रिक्त आहेत.
तर राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या रिक्त जागी जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू देऊन, त्यांच्याजागी शरद गावितांचा मंत्रीपदी समावेश केला जाण्याची चिन्हे आहेत.
तर दुसरीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्री सध्या दिल्लीत गेल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी काँग्रेसवाल्यांचा आटापिटा सुरूय. विधान परिषदेसाठी ठाण्याचे रवींद्र फाटक, जळगावच्या ललिता पाटील, नागपूरचे एस. क्यू. झामा, बीडचे टी. पी. मुंडे, बुलढाण्याचे गणेश पाटील आणि मुंबईचे अमरजीतसिंह मनहास यांची नावं शर्यतीत आहेत.
फाटक हे राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. तर ललिता पाटील, मुंडे आणि गणेश पाटील यांच्यासाठी माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत. झामांसाठी स्वतः मुख्यमंत्री वजन खर्ची घालत आहेत, तर मनहास यांच्यासाठी गुरूदास कामत प्रयत्नशील असल्याचं समजतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.