www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. `ही निवडणूक अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे,` या प्रक्षोभक वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली असून शहा यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.
दरम्यान, अमित शहांच्या या वक्तव्याचं भाजपनं समर्थन केलं आहे. मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्तांना अखिलेश सरकारनं वाऱ्यावर सोडलं होतं. त्यांची अवहेलनाच केल्याचा आरोप भाजप प्रवक्त्यांनी केला आहे.
तर शहा यांचं वक्तव्य वादग्रस्त असून धार्मिक आधारावर फूट पाडणारं आहे त्यामुळं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेत भाषणाची सीडी मागवली आहे. हा व्हिडिओ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तपासणीनंतर शहा यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुझफ्फरनगरच्या राजहार गावात गुरुवारी शहा यांनी एका सभेला संबोधित केलं होतं. खाप पंचायतींचं वर्चस्व असलेलं हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. याच ठिकाणी शहा यांनी एकवेळ माणूस अन्न-पाण्याशिवाय, झोपेशिवाय जगू शकेल, पण तो अपमान सहन करून जगू शकणार नाही, असं सांगत `अपमानाचा बदला तर घ्यावाच लागेल`, अशी चिथावणीखोर भाषा वापरली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.