लालबागचा राजा : मुजोर कार्यकर्त्यांची गंभीर दखल - पोलीस आयुक्त

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोर वर्तनाची गंभीर दखल आता मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही घेतली आहे. लालबागचा राजा मंडपात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2013, 11:43 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोर वर्तनाची गंभीर दखल आता मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही घेतली आहे. लालबागचा राजा मंडपात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करणार आहेत.
कार्यकर्ते आणि इतर कोणी महिलांशी गैरव्यवहार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. लालबागचा राजा मंडळाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.
दरम्यान, लालबाग राजाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पीएसआय अशोक सरमळे यांना मारहाण करणा-या कार्यकर्त्याला शिवडी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. मनोज शर्मा असं या आरोपीचं नाव असून त्याला १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळालाय.
मंगळवारी दुपारी तीन वाजता पीएसआय अशोक सरमळे आपलं कर्तव्य बजावत असताना मनोज शर्मा हा मुजोर कार्यकर्ता त्यांच्यावर धावून आला आणि त्यांना सरमळे यांना मारहाण केली. त्यामुळं त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
लालबागचा राजाच्या दरबारातील मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे संकेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. पण गृहमंत्र्यांचे हे संकेत बहुधा काळाचौकी पोलिसांपर्यंत पोहोचलेले नसावेत. कारण पोलिसांवर हात उचलण्याची मग्रुरी लालबागचा राजाचे कार्यकर्ते करत असतानाही, वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांच्या अरेरावीवर तीव्र नाराजी व्यक्त केलीये. एकच देव नवसाला पावतो आणि बाकीचे पावत नाहीत, हा भ्रमच चुकीचा असल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी अंतिम जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांचीच असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ