www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील सट्टेबाजीमध्ये सहभागी होती.
दिल्ली पोलिसांनी दावा केलाय की, राज कुंद्रा हवालाच्या माध्यमातून सट्टेबाजीमध्ये पैसे लावत होता. राज गेल्या तीन वर्षांपासून सट्टा खेळतोय. जवळजवळ एक करोड रुपयांचा फटका त्याला या सट्टेबाजीमध्ये बसलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजचा मित्र उमेश गोयंका गेल्या सहा वर्षांपासून सट्टेबाजी करतोय. राज कुंद्रा आपल्याच टीमवर पैसे लावत होता.
दुसरीकडे, शिल्पा शेट्टी ट्विटरवर म्हणतेय, ‘क्रिकेटच्या प्रेमाखातरच आम्ही आयपीएलमध्ये सहभागी झालो होतो आणि नेहमी नेहमी स्पष्टीकरण देणं खूप वाईट वाटतं’ सट्टेबाजीला तर शिल्पानं साफ नकार दिलाय. ती म्हणते, ‘आता या प्रकरणावर आम्ही काहीही स्पष्टीकरण देणार नाही’.
चेन्नई सुपर किंग्जच्या गुरुनाथ मयप्पननंतर कुंद्रा दुसरा असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे आयपीएलच्या एका टीमची मालकी आहे आणि सट्टेबाजीचे आरोप त्यांच्यावर आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर बीसीसआय या टीम्सना आयपीएलमधून निलंबित करू शकते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.