www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात... परंतु काहींच्या नशिबात तेही नसतं... म्हणूनच की काय, ती गाठ बांधून घेण्यासाठी त्यांना पुन्हा स्वर्गाचीच वाट धरावी लागते. पल्लवी पूरकायस्थ आणि अविक सेनगुप्ता या अभागी जीवांची ही करूण प्रेमकहाणी.
वडाळ्याच्या भक्ती पार्कमधल्या हिमालयन हाइट्स इमारतीतील फ्लॅटमध्ये २५ वर्षांची पल्लवी पूरकायस्थ आणि २८ वर्षांचा अविक सेनगुप्ता हे दोघेजण राहत होते. कायदे विषयक फर्ममध्ये कामाला असलेली पल्लवी आणि वकील असलेल्या अविकचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लिव-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते आणि लवकरच लग्नही करणार होते. परंतु त्यांचं हे मिलन बहुधा नियतीला मंजूर नव्हतं. गेल्यावर्षी ९ ऑगस्ट २०१२ चा दिवस काळ म्हणून उगवला. सोसायटीमध्येच सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या सज्जाद अहमद मोगल नावाच्या नराधमानं पल्लवीचा निर्घृण खून केला. त्यादिवशी अविक घरी परतला तेव्हा पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसली.
पल्लवीच्या खुनाची माहिती त्यानंच पोलिसांना दिली. पल्लवीशी सुखी संसाराची स्वप्नं पाहणा-या अविकसाठी हा मोठा मानसिक धक्का होता. आणि या धक्क्यातून तो अजिबातच सावरला नाही. पल्लवी पूरकायस्थ खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार असलेल्या अविकला दीड महिन्यांपूर्वी माहिमच्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कारण मानसिक धक्क्यानं त्याला ब्रेन डिसऑर्डर झालं होतं.
मानसिक धक्क्यानं त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्याची प्रकृती आणखीच बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु दुर्दैवाने गुरूवारी अविकची प्राणज्योतही मालवली. पल्लवी आणि पूरकायस्थ या दोघा अभागी जीवांच्या प्रेम कहाणीचा असा दुःखांत झाला. सध्याच्या ब्रेक अपच्या जमान्यात प्रेमी जीवांचं हे टायअप काळीज हेलावून टाकणारंच आहे.
लिपस्टिक बदलावी त्याप्रमाणे बॉयफ्रेंड आणि सिगरेटचा ब्रँड बदलावी तशी गर्लफ्रेंड बदलण्याच्या जमान्यात आपल्या प्रियेसाठी झुरत झुरत कुणीतरी आयुष्यच संपवतं, ही गोष्टच काळीज पिळवटून टाकणारी आहे. एक दुजे के लिए सिनेमात शेवटी म्हटलंय. `प्यार में हारनेवाले एक दुजे के लिए जान देते है और अमर हो जाते है....` पल्लवी आणि अविकच्या प्रेमकहाणीनं ते पुन्हा सिद्ध केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.