तेलाच्या गाळात खारफुटीचं जंगल घेतंय अखेरचा श्वास...

मुंबईच्या माहूल भागात खारफुटीचं जंगल नष्ट करण्यासाठी खराब झालेल्या तेलाचा गाळ वापर करण्यात आलाय. सुमारे शंभर एकरांवरील वनसंपदा यामुळं धोक्यात आली असून वनविभाग मात्र कासवाच्या चालीनं वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न करतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2013, 09:01 AM IST

www.24taas.com, कृष्णात पाटील, मुंबई
मुंबईच्या माहूल भागात खारफुटीचं जंगल नष्ट करण्यासाठी खराब झालेल्या तेलाचा गाळ वापर करण्यात आलाय. सुमारे शंभर एकरांवरील वनसंपदा यामुळं धोक्यात आली असून वनविभाग मात्र कासवाच्या चालीनं वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न करतंय.
मुंबईच्या समुद्र खाडीतील खारफुटीची जंगलं नष्ट करुन अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात. यासाठी एक वेगळी यंत्रणाच कार्यरत असल्याचं समोर आलंय. माहूल भागातल्या एसआरए प्रोजेक्टला लागून असलेलं खारफुटीचं जंगलही असंच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु झालाय. काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी खराब झालेल्या तेलाचा काळा गाळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकलाय. शेकडो टँकरमधून आणलेल्या या तेलाच्या गाळामुळं जवळपास शंभर एकरांवरील खारफुटीचं जंगल वाळत चाललंय.

दिवसानंतर जाग आलेल्या वनविभागानं खारफुटीचं जंगल वाचवण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. तेलाच्या गाळाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून तपासणीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ‘एसआरए’ प्रोजेक्टच्या गेटमधूनच टँकर आतमध्ये येऊनही संबंधित बिल्डरनं मात्र आपल्याला काही माहिती नसल्याचा पवित्रा घेतलाय. तसंच ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांचा थांगपत्ता लावण्यात वनविभागाला रस नाही. त्यामुळं वनसंपदा नष्ट करणारे अजूनही मोकाटच आहेत.